Follow Us

नवीन वर्षात पंढरीत विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट

नववर्षानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. पहाटेपासूनच दर्शन रांगेत भाविकांची संख्या लक्षणीय असून संपूर्ण परिसर विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या नामघोषाने दुमदुमून गेला आहे. वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीमार्फत आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळावे यासाठी टोकन दर्शन पास बुकिंग व्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. तसेच व्हीआयपी दर्शनावर निर्बंध, पूजेची संख्या मर्यादित करणे व इतर अनुषंगिक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

पंढरपूर; (pandharpur)

नववर्षाच्या पावन प्रारंभानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात गुरुवारी अत्यंत आकर्षक व मनमोहक फुलांची आरास करण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा, सभामंडप तसेच प्रमुख धार्मिक स्थळे विविध रंगीबेरंगी व सुगंधी फुलांनी सजवण्यात आल्याने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय व प्रसन्न वातावरणाने भारून गेला आहे. नववर्षाची सुरुवात श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या दर्शनाने व्हावी, या भावनेतून हजारो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले असून या फुलांच्या सजावटीने त्यांच्या भक्तिभावात अधिकच भर पडली आहे.

एक टन फुलांतून साकारली मनोवेधक आरास

नवीन वर्षात पंढरीत विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट 

नववर्षाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या या भव्य फुलांच्या सजावटीसाठी ऑर्किड, लिव्हडेजी, ड्रॅसेना, झेंडू, शेवंती आदी विविध प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. सुमारे एक टन फुले या सजावटीसाठी वापरण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले (sandesh Bhosle) यांनी दिली. विविध रंगसंगती, आकर्षक रचना आणि फुलांची सुबक मांडणी यामुळे श्रींचा गाभारा अधिकच तेजस्वी व मनोहारी दिसत आहे. फुलांच्या सुगंधाने आणि सौंदर्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे मन आपोआपच भक्तीभावाकडे वळत आहे.

सेवाभावातून मोफत फुलांची सजावट

ही संपूर्ण फुलांची आरास विठ्ठल भक्त श्री. प्रदीपसिंह ठाकूर (रा. आळंदी देवाची, पुणे) यांनी सेवाभावी वृत्तीने पूर्णतः मोफत करून दिली आहे. मंदिरावरील अपार श्रद्धा आणि विठुरायावरील निस्सीम भक्तीपोटी त्यांनी हा उपक्रम हाती घेतला. या कामासाठी सुमारे १२ कामगारांनी दिवसभर मेहनत घेतली. श्री संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल चौखांबी व सोळाखांबी, श्री रुक्मिणी चौखांबी तसेच मंदिरातील इतर प्रमुख भागांमध्ये ही फुलांची आरास करण्यात आली आहे. भाविकांकडून या सजावटीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून अनेक भाविक दर्शनानंतर समाधान व्यक्त करत आहेत.

भाविकांची गर्दी, मंदिर समितीची विशेष व्यवस्था

नववर्षानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. पहाटेपासूनच दर्शन रांगेत भाविकांची संख्या लक्षणीय असून संपूर्ण परिसर विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या नामघोषाने दुमदुमून गेला आहे. वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीमार्फत आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळावे यासाठी टोकन दर्शन पास बुकिंग व्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. तसेच व्हीआयपी दर्शनावर निर्बंध, पूजेची संख्या मर्यादित करणे व इतर अनुषंगिक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षाच्या स्वागतासाठी श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले असून या आकर्षक आरासेमुळे विठुरायाचे सावळे, साजिरे रूप अधिकच खुलून दिसत आहे. या पावन दर्शनाने नववर्षाची सुरुवात व्हावी, या भावनेतून आलेले भाविक समाधान, भक्ती आणि आनंद घेऊन परतताना दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या