श्री सिद्धेश्वर महायात्रा ; असे आहे नियोजन
यात्रेच्या नियोजनात देवस्थान व यात्रा समितीवर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. यात्रेच्या काळात तसेच अक्षता सोहळ्याच्या दिवशी स्थानिक वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यात्रास्थळी एलईडी स्क्रीन उभारण्यात येणार असून सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारला जाणार आहे. भाविकांसाठी वाहनतळाची व्यवस्था केली जाणार असून सर्व स्टॉलमध्ये अग्निशमन उपकरणे ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे
सोलापूर ;
श्री सिद्धेश्वर महायात्रा २०२६ सोलापूरमध्ये शांततेत, सुरक्षिततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पूर्वतयारी केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार सर्व संबंधित विभागांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समन्वय बैठक झाली. या बैठकीत यात्रेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करून विविध विभागांना कामांचे वाटप करण्यात आले. या बैठकीचा इतिवृत्त जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन विभाग व सर्व संबंधित यंत्रणांना पाठवण्यात आला असून त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे.
विविध विभागांना कामांचे वाटप
दि. ८ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस महानगरपालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत, याबाबत माध्यमांत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याबाबत महापालिकेने स्पष्ट केले आहे की, त्या दिवशी आधीच निश्चित केलेल्या शासकीय बैठका तसेच महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित स्टोरेज रूम, बूथ व्यवस्था व ईव्हीएम मशिन्सशी निगडित महत्त्वाची कामे असल्यामुळे काही अधिकाऱ्यांना उपस्थित राहता आले नाही. यामागे कोणताही निष्काळजीपणा किंवा यात्रेबाबत उदासीनता नसून प्रशासकीय समन्वयातील अडचण कारणीभूत होती.
यात्रास्थळी एलईडी स्क्रीन
यात्रेच्या नियोजनात देवस्थान व यात्रा समितीवर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. यात्रेच्या काळात तसेच अक्षता सोहळ्याच्या दिवशी स्थानिक वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यात्रास्थळी एलईडी स्क्रीन उभारण्यात येणार असून सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारला जाणार आहे. भाविकांसाठी वाहनतळाची व्यवस्था केली जाणार असून सर्व स्टॉलमध्ये अग्निशमन उपकरणे ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. देवस्थानकडून सर्व परिसरात मॅटिंग केली जाईल तसेच सुरक्षा रक्षक नेमले जातील. तलावाच्या बाजूला बॅरिकेडिंग व सुरक्षेची व्यवस्था केली जाईल. मनोरंजन नगरीतील पाळण्यांसाठी संरचनात्मक सुरक्षिततेची तपासणी करून समिती नेमली जाईल. सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेने तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश देवस्थानला देण्यात आले असून त्याचा अहवाल महापालिकेला सादर करावा लागणार आहे.
गर्दी नियंत्रणासाठी पुरेसा बंदोबस्त
पोलीस विभागाकडून अक्षता सोहळा व सर्व कार्यक्रमस्थळी गर्दी नियंत्रणासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी समन्वयक अधिकारी नेमले जातील. बॅरिकेड्स लावण्यात येतील, नो पार्किंग झोन घोषित केले जातील आणि आपत्कालीन मार्ग तयार करण्यात येणार आहेत.
महानगरपालिकेकडून होम मैदान येथे उभारण्यात येणाऱ्या मनोरंजन नगरीसाठी स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्ग तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग तयार केले जातील. परिसराची नियमित स्वच्छता केली जाईल, आवश्यक ठिकाणी मॅटिंग व रोलिंग केले जाईल, तसेच धूळ टाळण्यासाठी दररोज पाणी मारले जाईल. येथे चोवीस तास कार्यरत नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी व अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात येईल.
नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील स्वच्छता करण्यात येईल. मार्गावरील झाडांच्या फांद्या, केबल व वायर यांसारखे अडथळे काढून टाकण्यात येणार आहेत.
प्रदूषण आढळल्यास नियमांनुसार कारवाई
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून धूळ प्रदूषण रोखण्यासाठी दिवसातून दोन वेळा पाणी फवारणी, मॅटिंग व रोलिंग केली जाईल. होम मैदानावर वाळू टाकली जाईल. तीन ठिकाणी प्रदूषण मोजणी यंत्र बसवण्यात येणार असून दररोज तपासणी करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय, देवस्थान समिती व संबंधित विभागांना सादर केला जाईल. मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण आढळल्यास नियमांनुसार कारवाई केली जाईल.
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून यात्राकाळात शहरातील तसेच यात्रेतील सर्व हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉल्सची दररोज तपासणी केली जाईल. भेसळयुक्त अन्न विक्री होणार नाही याची खात्री केली जाईल आणि अन्नविषबाधा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाईल. सर्व अन्न विक्रेत्यांची पत्ता असलेली यादी देवस्थान व यात्रा समितीकडून संबंधित विभागाला देण्यात येईल. तात्पुरत्या दुकानांसाठी सुरक्षित अंतर पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा
श्री सिद्धेश्वर महायात्रा ही सोलापूर जिल्ह्यासाठी धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. भाविकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत स्वच्छता, आरोग्य, अग्निशमन, वाहतूक, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान समिती यांच्याशी सातत्याने समन्वय ठेवण्यात येत असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार पुढील सर्व बैठकींना महानगरपालिकेचे सक्षम अधिकारी उपस्थित राहतील आणि आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
श्री सिद्धेश्वर महायात्रा २०२६ सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सोलापूर महानगरपालिका पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती नगर अभियंता व इन्सिडेंट कमांडर सारिका अक्कूलवार यांनी दिली आहे.

0 टिप्पण्या