Follow Us

प्रणिती शिंदे कॉग्रेस सोडणार? भाजपच्या वाटेवर ?

प्रणिती शिंदे कॉग्रेस सोडणार?

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबाबत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी थेट आरोप करत, महापालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोलापूरसह राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

 प्रणिती शिंदे कॉग्रेस सोडणार? 

सोलापूर ; वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे ह्या भाजपमध्ये जाणार आहेत. खासदार शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तसे डिल झाले आहे, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकरांच्या या दाव्यामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पूर्वीही शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा झाल्या होत्या.

वंचित बहुजन आघाडीने सोलापूर महापालिकेसाठी ૨૨ उमेदवार निवडणुकीत रिंगणात उतरवले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यासाठी सुजात आंबेडकर हे रविवारी सोलापुरात आले होते. त्या सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी पुन्हा एकदा खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. सुजात आंबेडकर म्हणाले, आपल्या विरोधात भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूलाही भाजपच आहे. कारण खासदार प्रणिती शिंदे याही भाजपसाठी काम करतात, हे सर्वांना माहिती आहे.

सुजात आंबेडकर यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदरच खासदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या. ऑक्टोबर महिन्यातच त्या प्रवेश करणार होत्या मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना थांबायला सांगितले. तीन महत्वाच्या निवडणुका येतायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतायत. तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा आणि सेटिंग करून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा. त्यानंतर प्रणिती शिंदे ह्या काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी डिल प्रणिती शिंदे  आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली आहे, असा दावाही आंबेडकर यांनी केला आहे. राज्यात महाविकास आघाडी डुबलेली आहे. ती अस्तित्वात नाही. मुंबईसह इतर ठिकाणी एकमेका विरुध्द लढत आहे. यामुळे महाविकास आघाडी मोठ्या महानगरात अस्तित्वात असल्याचे दिसून येत नाही. सोलापूर शहरात दलित वस्ती, मुस्लिम मोहल्यात विकास रखडला आहे. सोलापूर शहरवासीयांना दर्जेदार सोयी सुविधा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबध्द आहे.


ईव्हीएम मशीन हटावची भूमिका कायम

ईव्हीएम मशीन हटावची भूमिका कायम असून त्यासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई सुरूच राहणार आहे. या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे अनेक ठिकाणी महापौर होतील. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद नगरपालिकांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला चांगले यश मिळाले. त्याचप्रमाणे यंदाच्या महापालिका निवडणुकीत निश्चित यश मिळणार आहे. आमचे महत्त्वाचे लक्ष हे जिल्हा परिषदेच्या निवडणुका राहणार आहे. या पत्रकार परिषदेस प्रभारी सोमनाथ साळुंखे, डॉ. नितीन ढेपे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, महेश जाधव, आतिश बनसोडे, विक्रांत गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


भाजप आणि काँग्रेस नाटक करतात

भाजप आणि काँग्रेस समोरासमोर रस्त्यावरत लढायचं नाटक करतात. मात्र यांचे सर्व व्यवसाय एक, यांची लग्न एक, यांचे नातेगोते एक, यांचे सर्व धंदे एक आणि प्रणिती शिंदे यांनी प्रवेश घेतला की यांचा पक्षसुद्धा एक होणार आहे. म्हणून काँग्रेसच्या नादाला लागू नका, तुम्ही काँग्रेसला मत दिलं म्हणजेच भाजपाला मत दिल्यासारखं होतं, असा दावा आंबेडकर यांनी केला. वंचितचा चार कलमी अजेंडा राहणार.


सोलापूर महापालिका निवडणुकी संदर्भात बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा हा चार कलमी राहणार आहे. यामध्ये येथील शहरवासीयांना दर्जेदार घरकुल, पाणी, चांगले रस्ते दर्जेदार, मोफत शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगार याला प्राधान्य देण्यात येणार आहे. सोलापुरात दलित वस्ती, मुस्लिम मोहल्यामध्ये विकास रखडला आहे. तिथे कचऱ्यासह विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या दूर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे लक्ष राहणार आहे.


राजकारणात मोठी खळबळ

प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुजात आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यामुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या आरोपांवर काँग्रेस किंवा प्रणिती शिंदे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.प्रणिती शिंदे या माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. सुशिलकुमार शिंदे हे काँग्रेस पक्षाचे आणि विशेषकरून गांधी घराण्याशी एकनिष्ठ असणारे म्हणून देशभरात ओळखले जातात. राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली आणि उलथापालथ झाली तरी त्यांनी कधीही काँग्रेसपासून विभक्त होण्याचा विचार केला नाही. पक्षाशी ते कायम एकनिष्ठ राहिले. काँग्रेस पक्षानेच त्यांना कोर्टातील एक पट्टेवाला ते मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल, अशा विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. अगदी उपराष्टÑपतीच्या निवडणुकीतील उमेदवार म्हणूनही त्यांना संधी देण्यात आली.


प्रणिती शिंदे यांचीही ओळख काँग्रेस पक्षामुळेच झाली. त्यांना सोलापूर मतदारसंघातून आमदार केले, खासदार केले. राहूल गांधी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. परंतु सध्या त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने मात्र सोलापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सध्या भाजपमध्ये जाण्याची चढाओढच नेत्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे या चर्चेने सोलापूरकर मात्र अस्वस्थ झाले आहेत. त्या खरेच भाजपमध्ये जाणार का, सुशिलकुमार शिंदे असे होऊ देतील का, असे अनेक प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. अर्थात सुजात आंबेडकर यांनी केलेले आरोप हे राजकीय आहेत. त्यामुळे त्याला लगेच गांभीर्यांने घेण्याची गरज नसली तरी सध्याच्या भाजपमय वातावरणामुळे या चर्चेला महत्त्व आले असल्याचे दिसत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या