Follow Us

येडेश्वरी शुगर साखर कारखान्याच्या गेटला ठोकले शेतकऱ्यांनी टाळे

 

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता राजकुमार यावलकर यांच्या नेतृत्वाखाली कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे कारखाना प्रशासनावर दबाव वाढला असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी व्यापक करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Barshi ; खामगाव येथील येडेश्वरी शुगर साखर कारखान्याच्या कारभाराविरोधात बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. चालू गळीत हंगामातील ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने कारखान्याच्या गेट बंद आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी कारखान्याचा प्रवेश पूर्णपणे रोखत, मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आक्रोश

बार्शी तालुक्यातील अनेक शेतकरी ऊस शेतीवर अवलंबून आहेत. ऊस तोड, वाहतूक आणि मजुरीचा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना पहिली उचल ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरते. परिसरातील बहुतांश साखर कारखाने शेतकऱ्यांना पहिली उचल तीन हजार रुपये किंवा त्याहून अधिक देत असताना, येडेश्वरी शुगर कारखान्याने मात्र सुमारे 2800 रुपयांची उचल दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. हा निर्णय अन्यायकारक असून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

संभाजी ब्रिगेडचा इशारा

या आंदोलनावेळी संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद यांनी कारखान्याच्या धोरणावर जोरदार टीका केली. आजूबाजूचे सर्व साखर कारखाने शेतकऱ्यांना योग्य दर देत असताना येडेश्वरी शुगरकडून मात्र कमी दर देण्यात येत असल्याने हा थेट शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले. हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही, अशी ठाम भूमिका मांडत त्यांनी कारखाना प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला. शेतकऱ्यांना पहिली उचल तीन हजार रुपये दिली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा लढा लढला जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

शेतकरी संघटनांची भूमिका

शेतकरी संघटनेचे शंकर गायकवाड यांनी कारखान्याने आजपर्यंत शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोप केला. यापुढे ही लूट सहन केली जाणार नाही, असे सांगत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी अखेरपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ नेते हनुमंतराव भोसले यांनी कारखान्याची जबाबदारी अधोरेखित केली. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर उचलणे आणि स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य देणे ही कारखान्याची नैतिक व सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. ऊस उशिरा उचलल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोठा सहभाग आणि पोलिस बंदोबस्त

या आंदोलनात विकास बारबोले, सदानंद आगलावे, समाधान भालेराव, रवींद्र मुठाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी कृष्णा काशीद, विक्रम घायतिडक, जोतिराम शिंदे, विनोद व्हॅन्कलास, अतिश लोंढे, विष्णू शिंदे, किरण कानगुडे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता राजकुमार यावलकर यांच्या नेतृत्वाखाली कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे कारखाना प्रशासनावर दबाव वाढला असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी व्यापक करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या