पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे असलेल्या पुरातन हेमाडपंथी सूर्यनारायण देवाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाली. या यात्रेला राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अनेक शतकांची परंपरा लाभलेल्या या देवस्थानाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व मोठे असून पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी येथे यात्रा भरते. या कालावधीत विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा, भजन-कीर्तन, भारुड यांचे आयोजन करण्यात येते. सूर्यनारायण देवाच्या कृपेने आरोग्य, तेज आणि समृद्धी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पहाटे महापूजा व सकाळी पालखी सोहळ्याची सुरुवात
पौष महिन्यातील तिसऱ्या रविवारी सूर्यनारायण देवाचा यात्रा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. पहाटे पाच वाजता सूर्यनारायण देवाची महापूजा माजी सरपंच बळवंत धनवडे व सौ. सोनाली धनवडे यांच्या हस्ते संपन्न झाली. या वेळी मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
सकाळी आठ वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय मस्के, सौ. सुरेखा मस्के, माजी सरपंच नितीन मस्के व सौ. राजश्री मस्के यांच्या हस्ते पालखीतील पादुकांचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, भक्तीमय जयघोषात पालखी मिरवणुकीला गावातील प्रमुख मार्गावरून सुरुवात झाली.
गावभर भक्तीमय वातावरण, चौकाचौकात स्वागत
पालखी मिरवणुकीच्या दरम्यान संपूर्ण नारायण चिंचोली गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. चौका-चौकात ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली. अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत, पालखीवर फुले उधळून देवाला वंदन केले.
पालखी मार्गावरील प्रमुख चौकांमध्ये भजन, भारुड व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी “जय सूर्यनारायण” च्या जयघोषात सहभाग घेतला. गावातील तरुण मंडळे, महिला बचत गट आणि ग्रामस्थांनी या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
मान्यवरांची उपस्थिती आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
या भव्य पालखी सोहळ्याला नारायण चिंचोलीच्या सरपंच नर्मदा लक्ष्मण धनवडे, उपसरपंच गहिनाथ चव्हाण, भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य लक्ष्मण तात्या धनवडे, तंटामुक्त अध्यक्ष विजय कोळेकर, माजी सरपंच विठ्ठल माने, चेअरमन विष्णू माने, व्हा. चेअरमन श्रीधर कोळेकर, सोसायटी सदस्य ज्ञानेश्वर मस्के, ज्ञानेश्वर बर्डे, शिवलिंग हिंगमिरे, शिवाजी वसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय सूर्यनारायण देव ट्रस्टचे संचालक आप्पासाहेब वाघमोडे, रमेश नाझरकर, हनुमंत गुंड, अमोल गुंड, सुनील माने, हरिभाऊ माने, नारायण गुंड, चंद्रकांत पाटील, पोपट पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष चव्हाण, नवनाथ कोले, बापूराव कोले, परमेश्वर गुंड, प्रशांत नलवडे, ज्ञानेश्वर वाघमोडे, नितीन गुंड, वैजनाथ मस्के, संतोष मस्के, श्रीमंत कोळेकर, मनोज मस्के, जनार्दन कंदारे, हनुमंत खरात, राजाभाऊ वाघ, सुरज पासले, विशाल चव्हाण, पंकज देवकते, परमेश्वर बर्डे, सचिन घाडगे, अमोल हाडमोडे, मुकुंद घाडगे, अभिजीत कवडे, दत्तात्रय बनसोडे, बाबा मुलानी, महेश माने, तानाजी वसेकर, संदीप हिंगमिरे, नागनाथ आहेर यांच्यासह असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या यात्रेमुळे नारायण चिंचोली गावात धार्मिक एकोपा, सामाजिक सलोखा आणि भक्तीभाव अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. सूर्यनारायण देवाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना भाविकांनी केली.


0 टिप्पण्या