Follow Us

ऊस दर जाहीर केला नाही, तर शेतकरी उसाने मारतील

 

आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शंकर गायकवाड यांनी कारखाना प्रशासनाला खणखणीत इशारा दिला. “आम्ही आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. मात्र, शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. जर तात्काळ थकीत बिले दिली नाहीत आणि अंतिम ऊस दर जाहीर केला नाही, तर शेतकरी उसाने मारतील,” असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सोलापूर/बार्शी (प्रतिनिधी) : दि. २ जानेवारी

पहिली उचल २८०० रुपये दिल्याने संताप

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या बार्शी तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याने ऊसाची पहिली उचल तीन हजार रुपयांऐवजी २८०० रुपये दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने आज येडेश्वरी साखर कारखान्यावर जोरदार आंदोलन करण्यात आले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी हे आंदोलन करण्यात आले असून, कारखान्याच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, ऊस उत्पादन खर्च, वाढलेली महागाई आणि शेतीसाठी लागणाऱ्या इनपुट खर्चाचा विचार करता २८०० रुपये ही पहिली उचल अन्यायकारक आहे. अनेक आंदोलने आणि निवेदने दिल्यानंतर कारखान्याने पहिली उचल तीन हजार रुपये जाहीर केल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर २८०० रुपयेच जमा झाल्याने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

तीन वर्षांची एफ.आर.पी. थकीत; अंतिम दर जाहीर करण्याची मागणी

आंदोलनावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी कारखाना प्रशासनावर गंभीर आरोप केले. कारखाना विकत घेतल्याच्या वेळी शेतकऱ्यांची बिले एफ.आर.पी. अधिक व्याजासह देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तीन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी अनेक तालुक्यांतील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे ऊस बिल अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.

शांततेच्या मार्गाने अनेक वेळा निवेदने देण्यात आली, आंदोलने करण्यात आली; परंतु कारखाना प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आता संयमाचा अंत झाला असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. प्रलंबित एफ.आर.पी. तात्काळ अदा करावी, तसेच अंतिम ऊस दर जाहीर करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, अशी स्पष्ट भूमिका गायकवाड यांनी मांडली.

अन्यथा शेतकरी उसाने मारतील

आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शंकर गायकवाड यांनी कारखाना प्रशासनाला खणखणीत इशारा दिला. “आम्ही आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. मात्र, शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. जर तात्काळ थकीत बिले दिली नाहीत आणि अंतिम ऊस दर जाहीर केला नाही, तर शेतकरी उसाने मारतील,” असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद, शेतकरी संघटनेचे हनुमंत भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद भालेकर, शकापचे रविकिरण कानगुडे, रयत क्रांती संघटनेचे कृष्णा काशीद, जनहित संघटनेचे राज्य प्रवक्ते रामराव काटे यांच्यासह रवींद्र मुठा, समाधान भालेकर, मुसा मुलानी, पप्पू आगलावे, पोपट आगलावे, विक्रम घायतीडक, विकास बारबोले, सदानंद आगलावे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. यावलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, कारखाना प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या