Follow Us

अतिक्रमण हटवले, रस्ते मोकळे झाले

 

tembhurni atikraman

ग्रामपंचायत कार्यालय हा परिसर प्रशासनाचा केंद्रबिंदू असून, येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कार्यालयासमोरील जागेत तात्पुरती पत्र्याची शेड, दुकाने व अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे वाहनांची कोंडी, पादचाऱ्यांना चालण्यास अडथळे आणि आपत्कालीन सेवांनाही अडचणी निर्माण होत होत्या. 

अतिक्रमण हटाव मोहीम 

टेंभुर्णी ; प्रतिनिधी

टेंभुर्णी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील तसेच लगतच्या परिसरात वाढलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांमुळे सार्वजनिक वाहतूक, नागरिकांची ये-जा आणि ग्रामपंचायतीच्या दैनंदिन प्रशासनिक कामकाजात मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने कठोर भूमिका घेत पोलीस बंदोबस्तात एकूण नऊ अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली. ही माहिती टेंभुर्णीच्या सरपंच सुरजाताई बोबडे यांनी दिली.

ग्रामपंचायत कार्यालय हा परिसर प्रशासनाचा केंद्रबिंदू असून, येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कार्यालयासमोरील जागेत तात्पुरती पत्र्याची शेड, दुकाने व अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे वाहनांची कोंडी, पादचाऱ्यांना चालण्यास अडथळे आणि आपत्कालीन सेवांनाही अडचणी निर्माण होत होत्या. याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या.

सकाळी १०.३० पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोहीम

सोमवार, दि. ५ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार ही कारवाई करण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कारवाईदरम्यान जेसीबी मशीन, ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत असल्याने आणि प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याने ही कारवाई अपरिहार्य ठरल्याचे ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले. अनेक वेळा सूचना देऊनही अतिक्रमणधारकांनी दखल न घेतल्यामुळे अखेर कायदेशीर मार्गाने ही मोहीम हाती घेण्यात आली.

आठ अतिक्रमणधारकांनी स्वतःहून शेड काढली

कारवाईदरम्यान जेसीबी मशीन व पोलीस बंदोबस्त पाहून आठ अतिक्रमणधारकांनी कोणताही वाद न घालता स्वतःहून पत्र्याच्या शेड व तात्पुरती बांधकामे काढून घेतली. ग्रामपंचायतीच्या या कारवाईला काही अतिक्रमणधारकांनी सहकार्य केल्याने मोठा वाद किंवा तणाव निर्माण झाला नाही.

मात्र, ग्रामपंचायत आवारातील एका महिलेचे राहते पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण अधिकृत प्रक्रियेनुसार पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. या वेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज होते. कोणताही अनुचित प्रकार न घडता कारवाई शांततेत पार पडली.

पूर्वसूचना व ठरावानंतरच कारवाई

कारवाईनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच सुरजाताई बोबडे यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सन २०२४ पासून अतिक्रमणधारकांना वेळोवेळी लेखी नोटिसा देण्यात आल्या होत्या. सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रामपंचायतीने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती.

फेब्रुवारी २०२५ मध्ये ग्रामपंचायतीच्या सभेत अतिक्रमण हटविण्याचा अधिकृत ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, माणुसकीच्या नात्याने आणि अतिक्रमणधारकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी काही काळ कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. तरीही संबंधितांनी अतिक्रमणे हटविली नाहीत. अखेर नियम, कायदा आणि सार्वजनिक हित लक्षात घेता ही कारवाई करणे आवश्यक ठरल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले.

पर्यायी व्यवस्थेचा विचार

सरपंच सुरजाताई बोबडे यांनी सांगितले की, अतिक्रमण हटविणे हा ग्रामपंचायतीचा उद्देश नसून, सार्वजनिक जागा मोकळी करून गावाचा सुव्यवस्थित विकास करणे हे आमचे ध्येय आहे. अतिक्रमण काढण्यात आलेल्या नागरिकांसाठी भविष्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा विचार केला जाईल.

त्यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत ग्रामपंचायतीमार्फत ९२० घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. जागा नसलेल्या भूमिहीन लाभार्थ्यांसाठी दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेचा प्रस्ताव सध्या अंतिम टप्प्यात आहे. जास्तीत जास्त गरजू नागरिकांना घरकुलांचा लाभ मिळावा, यासाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मान्यवरांची उपस्थिती

या कारवाईवेळी भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, सरपंच सुरजाताई बोबडे, उपसरपंच राजश्री नेवसे, ग्रामपंचायत अधिकारी संजय साळुंखे, विस्तार अधिकारी औदुंबर शिंदे, विस्तार अधिकारी डी. एन. मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य गौतम कांबळे, बाळासाहेब ढगे, जयवंत पोळ यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कारवाईमुळे ग्रामपंचायत कार्यालय परिसर मोकळा झाला असून, नागरिकांची ये-जा सुलभ होण्यास मदत होणार आहे. तसेच भविष्यात सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत अधिक काटेकोर भूमिका घेणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या