नववर्षाच्या स्वागताच्या रात्री दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे सुरू असलेल्या एका ऑर्केस्ट्रा बारवर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. मध्यरात्रीनंतर टाकण्यात आलेल्या या छाप्यात अश्लील नृत्य व बेकायदेशीर प्रकार उघडकीस आले. पोलिसांनी तब्बल ५६ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बार चालक, मालक, ग्राहक व बारबाला अशा एकूण ७० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध डान्सबार संस्कृतीवर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे.
सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव गावाच्या शिवारात असलेल्या पुष्पक ऑर्केस्ट्रा बारमध्ये बेकायदेशीर व अश्लील प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती. काही महिला तोकडे कपडे परिधान करून विभत्स हावभाव करत डिजेच्या तालावर अश्लील नृत्य करत असल्याचे, तसेच ग्राहकांकडून नोटा उधळल्या जात असल्याचे या माहितीत नमूद होते. या गंभीर माहितीनंतर पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी तत्काळ आपल्या विशेष पथकाला कारवाईचे आदेश दिले.
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार
विशेष पथकाने मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील कंदलगाव येथील पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर छापा टाकला. छाप्यादरम्यान प्रत्यक्षात ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. तेथे एकूण १२ महिला तोकडे कपडे घालून डिजेवर अश्लील नृत्य करताना आढळून आल्या. त्यांच्या समोर सोफ्यावर व स्टेजसमोर बसलेले ग्राहक नोटांसदृश कुपन उधळत अश्लील हावभाव करत नाचत होते. या प्रकारामुळे परिसरात बेकायदेशीर मनोरंजन व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
१२ बारबाला, ५५ ग्राहक रंगेहात पकडले
पोलिसांच्या छाप्यात एकूण १२ बारबाला आणि ५५ ग्राहक रंगेहात पकडण्यात आले. याशिवाय पुष्पक ऑर्केस्ट्रा बारचा चालक भारत राजाराम तांबे (रा. शिवाजी नगर, बाळे, सोलापूर) आणि मालक रोहित पांडुरंग चव्हाण (रा. सोलापूर) यांनाही ताब्यात घेण्यात आले. अशा प्रकारे एकूण ७० जणांविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे.
५६ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
या छाप्यात पोलिसांनी एकूण ५६ लाख १ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये डिजे साहित्य, ऑर्केस्ट्रा बारमधील विविध साहित्य, वाहने तसेच मोबाईल फोन यांचा समावेश आहे. बेकायदेशीर व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याचे या जप्तीवरून स्पष्ट झाले आहे. जप्त केलेल्या साहित्याचा तपास पुढील चौकशीत महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
विविध कलमांखाली गुन्हा दाखल
या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात महाराष्ट्र अधिनियम २०१६ चे कलम ३, ८ (१), (२), (४) तसेच भारतीय न्याय संहिता कलम २९६ (३)(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल अतराम, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल संनगल्ले, पोहेकॉ बिरजदार, पोहेकॉ गोरे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, गणेश पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री हुळळे, राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार तसेच मंद्रुप पोलीस ठाण्याच्या संपूर्ण पथकाने संयुक्तपणे केली.
ही कारवाई म्हणजे ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध डान्सबारविरोधातील कठोर भूमिकेचे स्पष्ट उदाहरण असून अशा प्रकारांना यापुढेही कठोर आळा घातला जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
0 टिप्पण्या