३१ डिसेंबरच्या रात्री अनेक नागरिक मित्रपरिवारासोबत नववर्षाचे स्वागत करतात. या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलिस प्रशासनाकडून ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत असून शहरातील प्रमुख चौक, वर्दळीचे रस्ते तसेच शहरहद्दीलगत वाहनांची तपासणी केली जाणार आहे. ब्रीथ ॲनालायझरच्या सहाय्याने वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार असून मद्यपी अवस्थेत वाहन चालवताना आढळून आल्यास संबंधित वाहनधारकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
वाहनचालकास दहा हजार रुपयांपर्यंत दंड Driver fined up to ten thousand rupees
मद्यपान करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यास वाहनचालकास दहा हजार रुपयांपर्यंत दंड व सहा महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः तरुणांनी उत्साहाच्या भरात कोणतेही बेजबाबदार कृत्य करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
बार्शी शहरात थर्टी फर्स्टच्या रात्री पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत फिरती पथके गस्त घालणार आहेत. संशयास्पद हालचाली, गोंधळ, सार्वजनिक ठिकाणी दंगा, धिंगाणा किंवा ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे.
या संदर्भात शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे(Balaji Kukde) यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नववर्ष आनंदाने साजरे करा, मात्र कायद्याच्या चौकटीत राहूनच. शहरात दोन ठिकाणी नाकाबंदी व पाच भागांत पेट्रोलिंग, फिक्स पॉईंट तयार करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांची नजर राहणार आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
ब्रीथ ॲनालायझरने वाहनांची तपासणी Inspection of vehicles with a breath analyzer
वाहतूक शाखेकडूनही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक धनाप्पा शेटे(Dhanappa Shete) यांनी सांगितले की, ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने शहरात दोन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. दोन स्वतंत्र पथकांद्वारे ब्रीथ ॲनालायझरने वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. शहरातील महत्त्वाचे चौक, वर्दळीचे मार्ग तसेच शहरहद्दीलगत ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाईल. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
सायबर फसवणुकीचे प्रकार वाढण्याची शक्यता Possibility of an increase in types of cyber fraud
दरम्यान, नववर्षाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने सायबर फसवणुकीचे प्रकार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे. व्हॉट्सअॅपवर अनेकदा नववर्षाच्या शुभेच्छा म्हणून पीडीएफ स्वरूपातील फाईल्स पाठवल्या जातात. काही वेळा या पीडीएफमध्ये एपीके फाईल्स लपवलेल्या असतात, ज्यामुळे मोबाईलमधील गोपनीय माहिती हॅक होण्याचा धोका असतो. त्यामुळे कोणतीही संशयास्पद फाईल, लिंक किंवा पीडीएफ डाउनलोड करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
एकूणच नववर्षाच्या स्वागतासाठी बार्शी शहरात पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून नागरिकांनी जबाबदारीने व सुरक्षिततेच्या दृष्टीने नववर्ष साजरे करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या