८२ लाखाचा बैल ;भन्नाट सौदा A bull worth 8.2 million; an amazing deal
एक नाही दोन नाही...तब्बल ८२ लाख रूपयांना हा सौदा ठरला. एका बैलाची किंमत ही ८२ लाख रूपये ठरण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. याच गावातील काही दिवसांपूर्वी चिमण्या नावाचा शंकरपटासाठीचाच बैल ६४ लाख रूपयांना विकल्या गेला होता.
दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने अकलूजमध्ये (Akluj) घोड्यांचा बाजार सध्या भरला आहे. देश विदेशातून या बाजारात घोडे विक्रीसाठी येत असतात. घोड्यांच्या बाजारात होणारी उलाढाल कोट्यवधी रूपयांची असते. आपल्यासारख्यांच्या भुवया उंचावतील, अशा या घोड्यांच्या किमती असतात. अगदी पाच हजारापासून पाच कोटी रूपयापर्यंतच्या या किमती ऐकून आपण चकीत होतो. आता हे सांगण्याचे कारण इतकेच की एक बातमी आली आहे छत्रपती संभाजीनगरमधून. फुलंब्री तालुक्यातील तळेगाव वाडीत एका ३ वर्षे वयाच्या बैलाला अशी काही किंमत आली की ती ऐकून कोणीही चकीतच झाले नाही तर नवल. आता बैल आणि त्याच्या किमती सध्या किती आहेत, तर अगदी २० हजारापासून एक लाख रूपयांपर्यंत सध्या बैलांच्या किमती आहेत. अगदी एक लाख ते दोन लाखाच्या आता काही व्यवहार होतात. यापेक्षा सध्या तरी बैल बाजारात मोठे व्यवहार झाल्याचे दिसत नाही.
बैल विकणे जिकरीचे काम
एक तर शेतीमधील बहुतेक कामे ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात असल्याने शेतकºयांकडे बैलांची जोडी अगदी कमी प्रमाणातच दिसते. ट्रॅक्टरने शेतीची मशागत सुरू झाली आणि मग पारंपारिक मशागत करणारी बैलजोडी आता फारशी दिसेनाशी झाली. याचा परिणाम अर्थातच त्याच्या किमतीवरही झाला. बाजारात मागणी कमी झाली. बैल विकणे जिकरीचे काम होऊन बसले. तर सांगण्याचा मुद्दा असा की तळेगाव वाडीत २० आॅक्टोबरला दोन शेतकरी पुण्याहून आले. कशासाठी आले, तर त्यांना राजा नावाचा बैल पाहयचा होता. शंकरपटात राजाने अशी काही कामगिरी केली आहे की त्याची ख्याती राज्यभरात पोहोचली आहे. २ हिंदकेसरी आणि १२ वेगवेगळे पुरस्कार त्याच्या खात्यावर जमा आहेत. शंकरपटातील त्याची कामगिरी खूपच गाजली आहे. आता शंकरपट म्हणजे काय तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शंक़रपट म्हणजे बैलगाडीची शर्यत.
शंकरपटाची परंपरा ३०० वर्षे जुनी
वेगवेगळ्या भागात या बैलगाडीच्या शर्यतीला वेगवेगळी नावे आहेत आणि शर्यतीचे नियमही वेगवेगळे आहेत. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात बैलगाडी शर्यत असे म्हणतात, तर विदर्भात यालाच शंकरपट असे म्हटले जाते. शंकरपटाची परंपरा ३०० वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. यात शर्यतीच्यावेळी दोन बैलगाड्या सोडल्या जातात किंवा एक बैलगाडीही सोडली जाते. दोन बैलगाड्या सोडल्या असतील तर सर्वात आधी निर्धारित केलेल्या ठिकाणी पोहचणारी गाडी विजयी घोषित केली जाते. जर एक-एक गाडी सोडली तर मग ही स्पर्धा घड्याळाच्या काट्यावर मोजली जाते. तर अशा या शंकरपटावर राजाची कामगिरी जबरदस्त ठरली आहे.
राजाला पाहिले आणि प्रेमात पडले.
या राजाची ख्याती ऐकूनच पुण्याचे दोन शेतकरी पृथ्वीदादा कुठवड आणि बाबुराव आप्पा कामठे तळेगाव वाडीला आले. हे दोघेही बैलांचे खास शौकिन तर आहेतच पण कामठे यांच्या वडीलांना बैलगाडी शर्यतीचा भारी नाद. वडीलांनी राजा आपल्या दावणीला असला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली आणि म्हणून मग वडीलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाबुराव आप्पा कामठे थेट तळेगाव वाडीत पोहोचले. येथील शाकेर आणि जाकेर मजिद खान या दोन भांवडांनी सांभाळेला बैल म्हणजे राजा. अवघ्या तीन वर्षाचा. पण बैल म्हणून नाही तर कुटुंबातील सदस्य म्हणूनच या दोन्ही भावांनी त्यांचा सांभाळ केलेला. त्याला लहानपणापासूनच या दोघांनी शंकरपटाचे खास ट्रेनिंग दिले. त्याच्या खाण्यापिण्यावर बारकाईने लक्ष दिले. तळेगाव वाडीत आल्यानंतर पुण्याच्या कामठे आणि कुठवड यांनी राजाला पाहिले आणि पाहताच त्याच्या प्रेमात पडले. शाकेर आणि जाकेर यांच्यासोबत सौद्याला बसले. एक नाही दोन नाही...तब्बल ८२ लाख रूपयांना हा सौदा ठरला. एका बैलाची किंमत ही ८२ लाख रूपये ठरण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. याच गावातील काही दिवसांपूर्वी चिमण्या नावाचा शंकरपटासाठीचाच बैल ६४ लाख रूपयांना विकल्या गेला होता.
आता ८२ लाख ॅरूपये किंमत मोजून या पुण्याच्या दोन शेतकºयांनी राजाला विकत घेतले आहे. आपल्या मुलाने इच्छा पूर्ण केल्याचे पाहून बापाचा उर भरून आला आहे. कामठे आणि कुठवड या दोघांनीही राजाला आता शंकरपटात उतरविण्याचे ठरविले आहे. बाकी काहीही म्हणा पण बैलाला आलेली ही किंमत पाहून सगळ्याच शेतकºयांचा उर भरून आल्याशिवाय राहणार नाही. शेवटी शेतीचे कितीही यांत्रिकीकरण झाले तरी आपल्या सर्जा-राजावरील प्रेम कायमच राहणार आहे.
.png)
Post a Comment